बुलढाणा (सतिष दांडगे ) : मलकापूर येथील गोविंद विष्णू महाजन विद्यालयात अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या अनुषंगाने मान्यते करिता लिपिकाने दोन लाख रुपयांची मागणी केली. यातील तक्रारकर्त्याकडून एक लाख रुपयांची लाच स्विकारताना (ACB Trap) बुलढाणा लाच लुचपत विभागाच्या पथकाने संबंधित लिपीकास रंगेहाथ अटक केली. विलास उत्तमराव सोनोने असे लाचखोर लिपीकाचे नाव आहे. १२ जून रोजी बसस्थानकावर रचलेल्या सापळ्यात हा लिपीक अडकला.
लाच घेताना रंगेहाथ पकडलं
या घटनेतील तक्रारदार हे मलकापूर येथील सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांचे वडील मलकापूर शिक्षण समिती अंतर्गत असलेल्या हिराबाई संचेती कन्या शाळेवर शिपाई पदावर कार्यरत असतांना सन २०१२ मध्ये त्यांचे निधन झाले होते. त्यांच्या जागी अनुकंपा तत्वावर लहान भावाला नोकरीवर लावण्याकरिता तक्रारदार प्रयत्नशील होते. तर अनुकंपा तत्त्वावर नोकरीची मागणी केल्यानंतर मलकापूर शिक्षण समिती अंतर्गत असलेल्या शैक्षणिक संस्थेचे कामकाज पाहणारे विलास उत्तमराव सोनोने जे सद्यस्थितीत गोविंद विष्णू महाजन महाविद्यालयात मुख्य लिपिक पदावर कार्यरत आहेत त्यांनी तक्रारदाराकडे अनुकंपा तत्त्वावरील शिपाई पदाच्या मान्यते करिता दोन लाख रुपयांची मागणी केली. अनुकंपा तत्त्वावरील नेमणूकीबाबत मान्यतेचा प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालय, बुलडाणा येथे मलकापूर शिक्षण समिती या संस्थेमार्फत सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावास मान्यता मिळवून देण्यासाठी यातील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) बुलडाणा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना ही रक्कम द्यावी लागते, असे लिपीक विलास सोनोने यांनी सांगितले. हक्काच्या जागेवर भावाच्या नोकरी करिता पैसे मागितले जात असल्याने त्यांनी बुलढाणा लाचलुचपत विभागाकडे रितसर तक्रार केली.एसीबीने याबाबत पडताळणी केली. ठरल्यानुसार दोन लाख रुपयांपैकी एक लाख रुपये नगदी रोख जमा करण्याचे ठरले. त्यानुसार स्थानिक बस स्थानकात विलास सोनोने हजर झाले तेथे आधीच एसीबीच्या पथकाने सापळा रचला होता. तक्रारदाराने लिपीक सोनोने याच्यास हातात एक लाख रुपयांची रक्कम देताच एसीबीच्या पथकाने लिपीकास रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले. पोलीस उपअधिक्षक संजय चौधरी, पोहवा. विलास साखरे, ना.पो.शि. विनोद लोखंडे, मो. रिजवान, प्रविण बैरागी, म.पो.शि. स्वाती वाणी, पो.शि. गौरव खत्री यांनी सदरची कामगिरी केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याआला आहे.
बेहिशेबी मालमत्तेविषयी तक्रारी करा
भ्रष्टाचाराच्या मार्गाने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी बेहिशेबी संपत्ती जमविली असल्यास त्याबाबतही नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यानंतर सत्यता पडताळून कारवाई करण्यात येते. विशेष म्हणजे तक्रारकर्त्याच्या नावाबाबत गुप्तता पाळली जाते, महसूल विभाग, नगर परिषद, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, तहसील, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस दल, महावितरण, व्यवसायकर विभाग, विक्रीकर विभाग, नगर रचना विभाग, जिल्हा उपनिबंधक विभाग, दुय्यम निबंधक व उपनिबंधक विभाग, कोषागार विभाग, सहकारी पतसंस्था, राज्य परिवहन महामंडळ, उपप्रादेशिक परिवहन विभाग, शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या सर्व संस्था, शैक्षणिक संस्था, सर्व शासकीय कार्यालये, अन्य सर्व महामंडळे, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, सरकारी नोकरांसाठी लाच मागणारे एजंट, मध्यस्थांविरुद्ध तक्रार प्राप्त झाल्यास कारवाई करण्यात येते.
- Advertisement -
- Advertisement -
नागरिकांना आवाहन
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करुन देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
लाच लुचपत प्रतिबंधक, विभाग,बुलडाणा पोलीस उप अधीक्षक
@दुरध्वनी क्रं – 07262- 242548
@टोल फ्रि क्रं 1064
ही बातमी वाचा ..असे मिळवा दुग्ध व्यवसाय कर्ज आणि बना यशस्वी उदयोजक !