Acb trap in Morshi
मोर्शी : कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी एका शेतकऱ्याकडून १३ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या मंडळ कृषी अधिकाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. ही कारवाई गुरुवार, २१ मार्च रोजी सायंकाळी स्थानिक सिंभोरा चौक येथे करण्यात आली.
पांडुरंग नामदेव मस्के (२८) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर मंडळ कृषी अधिकाऱ्याचे नाव असून ते तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. या प्रकरणातील ३९ वर्षीय तक्रारकर्ते हे शेतकरी असून त्यांनी कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत शेतातील संत्राबागेच्या पुनर्जीवनाकरिता मिळणाऱ्या अनुदानासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. त्या अनुषंगाने ते तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मंडळ कृषी अधिकारी पांडुरंग मस्के यांना भेटले. त्यावेळी पांडुरंग मस्के यांनी तुम्हाला सदर योजनेचा लाभ मिळू शकत नाही
तरीसुद्धा मी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवून देतो. सदर योजनेचे अनुदान तुमच्या बँक खात्यात जमा झाल्यावर त्यातील ५० टक्के रक्कम मोबदला म्हणून मला द्यावी लागेल, असे तक्रारकर्ते यांना म्हटले. त्यावर तक्रारकर्ते शेतकरी यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात आली. पडताळणीत पांडुरंग मस्के यांनी १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती १३ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सापळा रचण्यात आला. सिंभोरा चौकात तक्रारकर्त्या शेतकऱ्याकडून लाचेची १३ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच मंडळ कृषी अधिकारी पांडुरंग मस्के यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. या प्रकरणी त्यांच्याविरुद्ध मोर्शी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक योगेशकुमार दंदे व शिल्पा भरडे, आशिष जांभोळे, शैलेश कडू, उपेंद्र थोरात, सतीश किटुकले यांनी केली.