Buldana Acb News
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथील तहसीलदार सचिन जैस्वाल यांच्यासह शिपाई पंजाबराव ताठे, तहसीलदाराचे वाहन चालक मंगेश कुलथे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील कार्यालयात ३५ हजाराची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. तहसीलदारांच्या घराची झडती घेतली असता लाखोंची रक्कम आढळून आली.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा व्यवसाय असून वाळुचा लिलाव झालेला असल्यास ते कायदेशीर परवाना घेवून वाळु वाहतुक करतात. परंतु सध्या वाळू वाहतुकीचा लिलाव झालेला नसून अवैधरित्या वाळु वाहतूक सुरु आहे. तक्रारदार यांना ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळू वाहतूक सुरु करण्यासाठी यातील आरोपी मंगेश कुलथे यांचेकडून सचिन जैस्वाल तहसीलदार सिंदखेडराजा यांचेकरीता तक्रारदार यांचेकडे एका ट्रॅक्टरसाठी प्रतिमहिना ३५ हजार लाचेची मागणी होत असल्याबाबत तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बुलडाणा यांना दिली होती. त्यानुसार १२ एप्रिल रोजी लाचमागणी पडताळणी कार्यवाही केली असता मंगेश शालीग्ग्राम कुलथे, पद चालक, तहसील कार्यालय, सिंदखेडराजा यांनी तक्रारदार यांचेकडे सचिन जैस्वाल, तहसिलदार, सिंदखेडराजा यांचेकरिता ३५ हजार रुपये लाच मागणी करुन सदर लाच देण्यासाठी पंजाबराव तेजराव ताठे शिपाई तहसील कार्यालय, सिंदखेडराजा यांनी प्रोत्साहन देवून सचिन शंकरलाल जैस्वाल तहसिलदार, सिंदखेडराजा यांनी सदर लाच रक्कम स्वीकारण्यास संमती देवून सदर लाच रक्कम मंगेश कुलथे यांचेकडे आजच देण्यास सांगीतले. मंगेश कुलथे यांनी तक्रारदार यांना लाच रक्कम घेवून बोलावल्याने १२ एप्रिल रोजी सापळा रचून कारवाई केली असता मंगेश कुलथे यांना तक्रारदार यांचेकडून ३५ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले आहे. वरील तिनही आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन सिंदखेडराजा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
सदर कार्यवाही मारुती जगताप, पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती, परिक्षेत्र अमरावती अनिल पवार, अप्पर पोलीस अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती, परिक्षेत्र अमरावती श्रीमती शितल घोगरे, पोलीस उपअधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलढाणा गजानन शेळके, पोलीस उपअधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, वाशिम यांचे मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी सचिन इंगळे, सापळा मदत पथक गजानन शेळके, पोलीस उपअधिक्षक, लाप्रवि वाशिम, पोलीस निरीक्षक, महेश भोसले, पोलीस निरीक्षक, एस आय शाम भांगे, पोहेकाँ प्रविण बैरागी, पोना विनोद लोखंडे, जगदीश पवार, पोकॉ रंजित व्यवहारे, मपोकॉ स्वाती वाणी, चानापोकॉ नितीनशेटे, पोकॉ मधुकर रगड, अॅन्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा यांनी पार पाडली
तहसीलदारांच्या निवासस्थानात मिळाले ३७.५२ लाख
Buldana Acb News :सापळा कार्यवाहीनंतर सचिन जैस्वाल, तहसिलदार यांना ताब्यात घेवून त्यांची राहते शासकीय निवासस्थानाची पंचासमक्ष घरझडती घेतली असता घरझडती दरम्यान सचिन जैस्वाल, तहसिलदार यांचे निवासस्थानामध्ये एकूण ३७ लाख ५२ हजार १८० रूपये रोख रक्कम मिळून आले आहे. तसेच सचिन जैस्वाल, तहसिलदार यांचे परभणी येथील राहते घराची अॅन्टी करप्शन ब्युरो, परभणी, घटकाने घरझडती घेतली असता सदर घरामध्ये ९ लाख ४० हजार रूपये रोख रक्कम मिळून आले आहे. सदर रक्कमा जप्त करण्यात आल्या आहेत. त्याच्याकडील इतर मालमत्तांचा शोध सुरू आहे.