Buldana News
बुलढाणा : पोलिसांची बनावट ओळखपत्रे तयार केल्याप्रकरणी साई फोटो स्टुडिओचे जमील शाह वासीम शाह व भावना फोटो स्टुडिओचे प्रशांत गायकवाड (रा. कारंजा चौक, बुलढाणा) यांच्याविरुद्ध १३ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील वरिष्ठ श्रेणी लिपिक सुषमा संजय जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांच्याकडे पोलीस विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे ओळखपत्रासंबंधीचे काम आहे. बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी दिलेल्या लेखी विनंती अर्जावरून त्यांचे पोलीस विभागाचे ओळखपत्र अधिकृत प्रेसमधून तयार करून कार्यालयाच्या सही-शिक्यानिशी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना रीतसर पुरविण्यात येते. मात्र, १२ एप्रिल रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात ड्युटीवर हजर असताना सुषमा जाधव यांच्या असे लक्षात आले की, बुलढाणा जिल्हा पोलीस घटकातील काही पोलीस कर्मचाऱ्यांना बुलढाणा
कारंजा चौकातील साई फोटो स्टुडिओ व भावना फोटो स्टुडिओमधून पोलीस अधीक्षक यांच्या बनावट सहीचे, बनावट पोलीस ओळखपत्र बनवून दिले असून, आणखी काही बनावट पोलीस ओळखपत्र तयार करून दिले जात आहेत. म्हणून सुषमा जाधव यांनी १२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस कर्मचारी दत्ता जिते यांना बनावट पोलीस ओळखपत्राबाबत माहिती दिली.
खात्री करण्यासाठी साई फोटो स्टुडिओ व भावना फोटो स्टुडिओ येथे जाऊन त्यांचे स्वतःचे ओळखपत्र बनवून आणण्यास पाठविले. दत्ता जिते साई फोटो स्टुडिओ, कारंजा चौक, बुलढाणा येथे जाऊन त्यांचे पोलीस ओळखपत्र घेऊन दुपारी २ वाजता कार्यालयात आले. यावेळी त्यांनी सांगितले की, साई फोटो स्टुडिओचे मालक जमील शाह वासीन शाह यांनी १५० रुपयांत त्यांच्या स्टुडिओमध्ये कॉम्प्युटरवर ओळखपत्र बनवून दिले आहे. हे ओळखपत्र सुषमा जाधव यांनी पाहिले असता ते पूर्णपणे बनावट असून त्यावर असलेली स्वाक्षरीसुद्धा बनावट असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
- Advertisement -
- Advertisement -
दरम्यान, साई फोटो स्टुडिओचे जमील शाह वासीम शाह यांनी पोलीस विभागाची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांचे फोटो स्टुडिओमध्ये कॉम्प्युटरवर दत्ता जिते यांना पोलीस अधीक्षकांच्या बनावट सहीचे पोलीस ओळखपत्र तयार करून दिले. यापूर्वीसुद्धा त्यांनी व भावना फोटो स्टुडिओचे प्रशांत गायकवाड यांनी पैसे घेऊन अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना बनावट पोलीस ओळखपत्र तयार करून देऊन पोलीस विभागाची फसवणूक केली आहे. यावरून जमील शाह वासीन शाह व प्रशांत गायकवाड यांच्यावर भादंविच्या कलम ४२०, ४६५, ४६६, ३४ अंतर्गत बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम सोनुने करीत आहेत.