Buldhana Agricultural News
बुलढाणा, : जिल्ह्यातून गुलाबी बोंडअळीला हद्दपार करण्यासाठी कृषी विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांकडून सहकार्याची अपेक्षा ठेवण्यात आली आहे. गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम छेदण्यासाठी मान्सूनपूर्व कापूस लागवड थांबविणे गरजेचे असल्याने मान्सूनपूर्व कापसाची लागवड न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर १ जूनपूर्वी कपाशीचे बियाणे विक्री करणाऱ्या. कृषी केंद्राचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली जात असल्याने गुलाब बोंडअळीचे नियंत्रण करणे अवघड झाले आहे. कपाशीची मान्सूनपूर्वीच होणारी लागवड शेतकऱ्यांना मारक ठरली आहे.यातूनच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढल्याचे कृषी विभागाने म्हटले आहे. यावर मात करण्यासाठी कृषी विभागाच्या निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण विभागाने जिल्ह्यामध्ये १ जूननंतरच शेतकऱ्यांना कपाशीचे बियाणे विक्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत. १ जूनपूर्वी कृषी निविष्ठा विक्रेत्याने कपाशी बियाणांची विक्री केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कुणी विक्री करताना आढळून आल्यास घाऊक व किरकोळ विक्रेत्यांचा परवाना रद्द केला जाणार आहे. मान्सूनपूर्व कापसाची लागवड केली तर 1 कपाशीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढ होते, असा शेतकऱ्यांचा तर्क आहे.
तरच भेदू शकते बोंडअळीचे चक्र कापूस उत्पादक पट्ट्यात मान्सूनपूर्व कापूस लागवड करण्याची प्रथा वाढली आहे. याचा दुष्पपरीणाम म्हणून गुलाबी बोंडअळीचा प्रकोप वाढला आहे. सन २०१७ मध्ये हा प्रकार प्रकर्षाने दृष्टीस पडला. यावर मात करण्यासाठी २०१८ ते २०२२ या कालावधीत उपाययोजना हाती घेण्यात आली. यातून गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. गुलाबी बोंडअळीचे चक्र भेदण्यासाठी मान्सूनपूर्व कपाशी लागवड थांबविण्याच्या कृषी संचालकांच्या सूचना आहेत.
- Advertisement -
- Advertisement -
कृषी केंद्रसंचालकांना सूचना कपाशीची मान्सूनपूर्व लागवड टाळता यावी म्हणून बोंड अळीचा जीवनक्रम भेदण्यासाठी जूननंतरची लागवडच उपयोगी पडणारी आहे. कोषावस्थेत जाणाऱ्या अळीच्या विस्ताराचे चक्र थांबविता येणार आहे. त्यासाठी १ जूनपूर्वी कपाशी बियाणांची विक्री करू नये, अशा सूचना कृषी केंद्र संचालकांना देण्यात आल्या आहेत.