Buldhana Police
बुलढाणा : जिल्ह्यातील सर्व ३३ पोलीस स्टेशन अंतर्गत एकाच वेळी ‘ऑपरेशन ऑल आउट’ मोहीम १५ फेब्रुवारीला राबविण्यात आली. सर्व पोलिसांसह वरिष्ठ अधिकारीही रस्त्यांवर ऑन ड्युटी होते. दरम्यान सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी झाडाझडती घेतली. ३२ वाहनांवर कारवाई करण्यात आली. ३ आरोपींना ताब्यात घेतले तर ४ लाखाच्या टोयोटा कंपनीच्या वाहन व ६८ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
ऑपरेशन ऑल आउट मोहीम
बुलढाणा जिल्ह्यातील ३३ पोलीस स्टेशन अंतर्गत ऑपरेशन ऑल आउट मोहीम हाती घेण्यात आली होती. चोरीच्या घटना रोखण्यासाठी व गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी ही मोहीम जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आली. ऑपरेशन ऑल आऊट अंतर्गत जिल्ह्यातील ३७ महत्वाचे ठिकाणी नाकाबंदी पॉइंट लावण्यात आले. पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा – बुलढाणा यांची विशेष पथके तयार करून जिल्ह्याच्या अभिलेखावरील पाहिजे व फरार आरोपी, निगरानी बदमाश, समन्स-वॉरंट असलेल्या आरोपींचा व गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला. नाकाबंदी दरम्यान एकूण ९७१ वाहनांची तपासणी करण्यात येवून ३२ वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
टोयोटा चारचाकी हस्तगत
दरम्यान स्था. गु.शा. बुलढाणा यांचे नियुक्त विशेष पथकातील पोहेकॉ दिपक लेकुरवाळे, पंकज मेहेर, केदार फाळके यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करुन आरोपी दिपक गायकवाड रा. बुलढाणा यास हातभट्टी दारु बाळगतांना पकडले. त्याचे कडून ४० लिटर हात भट्टी दारु २०० लिटर व मोहसडवा असा एकूण १५,६०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.तसेच संशयास्पद रितीने फिरत असलेला ईसम कैलास मारोती बोरकर रा. मिलींदनगर, बुलढाणा याला ताब्यात घेण्यात आले. सपोनि अमित वानखडे, पोउपनि श्रीकांत जिंदमवार, पोहेकॉ, दशरथ जुमडे, सुधाकर काळे, पोना संजय नागवे, विजय मुंढे या पथकाने कोम्बींग ऑपरेशन दरम्यान पो.स्टे. अंढेरा हद्दीमध्ये पेट्रोलिंग करुन, रात्री दरम्यान संशयास्पद रितीने फिरणारा इसम किशोर हनुमंत पवार रा. संजयनगर, देऊळगांव राजा यास पकडले. तसेच आरोपी यांचे कडून ४ लाख रुपये किंमतीची टोयोटा कंपनीचे चारचाकी वाहन हस्तगत करण्यात आले. सदर आरोपी विरुध्द पो.स्टे. अंढेरा येथे महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.
हातभट्टीवर छापा
सपोनि मनिष गावंडे, पोहेकॉ राजेंद्र माळी, पोना दिगंबर कपाटे, पोकॉ विजय सोनोने, पोकॉ, राहूल बोर्डे यांचे पथकाने पो.स्टे. शिवाजीनगर- खामगांव, खामगांव शहर, खामगांव ग्रामीण या भागातील सराईत गुन्हेगार, निगरानी बदमाश यांचा शोध घेतला. तसेच पोहेकॉ ओमप्रकाश सावळे, राजेंद्र टेकाळे, सुनिल खरात, संजय भुजबळ यांचे पथकाने पो.स्टे. बुलढाणा ग्रामीण हद्दीमध्ये पेट्रोलिंग करुन अवैधरितीने हातभट्टी दारु गाळणारे ईसमांवर रेड करुन दारु व मोह सडवा असा एकूण ५३, १२० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. अज्ञात आरोपी विरुध्द पो.स्टे. बुलढाणा ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.