Crime News
अमरावती (Amravati) एका तरुणीचे अपहरण करून तिला शीतपेयातून गुंगीचे औषध देण्यात आले. बेशुद्धावस्थेत तिचे अश्लील फोटो काढून त्याद्वारे तिला शरीरसुखाची मागणी करण्यात आली. आर्यसमाजात तिचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले. ही घटना मंगळवार, १९ मार्च रोजी चांदूरबाजार ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश गोवर्धन येवकार (२५) रा. टोंगलाबाद सावळापूर, अचलपूर व शरद लाडकुजी कोसरे रा. पथ्रोट २ अशी गुन्हा दाखल करण्यात वि आलेल्या आरोपींची नावे आहेत. पीडित तरुणी व योगेश हे दोघे एकमेकांना ओळखतात. त्या ओळखीचा गैरफायदा घेत योगेशने चांदूरबाजार येथील शिरजगाव बसस्टॉपवरून पीडित तरुणीचे जबरीने दुचाकीवर बसवून अपहरण केले. तो तिला सावळापूर येथे घेऊन गेला. तेथे त्याने तिला पिण्यासाठी शीतपेय दिले. त्या शीतपेयात योगेशने गुंगीचे औषध मिसळले होते. त्यामुळे तिला काही वेळातच गुंगी आली. बेशुद्धावस्थेत योगेशने तिचे काही अश्लील फोटो काढले. ती शुद्धीवर आल्यावर योगेशने तिला तिचे अश्लील फोटो दाखविले. ते फोटो व्हायरल करेन, अशी धमकी देऊन त्याने तिला शरीरसुखाची मागणी केली. तरुणीने त्यास नकार दिला. त्यामुळे योगेशने तिला पथ्रोट येथे नेले. तेथे योगेशने तेथीलच शरद कोसरे याच्याशी संगनमत करून पीडित तरुणीशी स्वतःचे जबरदस्तीने लग्न लावले. त्याने आर्य समाजात बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्रदेखील बनविले. या संपूर्ण प्रकारानंतरही बदनामीच्या भीतीने पीडित तरुणी गप्प राहिली. तिने सर्व सहन केले. मात्र, योगेशचा त्रास वाढतच चालल्याने तिने याबाबत वडिलांना माहिती दिली. त्यानंतर तिने वडिलांसह चांदूरबाजार ठाणे गाठून तक्रार दाखल केली.