बुलढाणा : cyber crime बाबत महत्त्वाची बातमी आज आपण जाणून घेणार आहोत. एचडीएफसी बँकेच्या सॅलरी अकाऊंटमधून पाठवलेले दहा हजार रुपये चोवीस तास लोटूनही बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत जमा झाले नाही. असे का झाले? याचा शोध घेतानाच मलकापूर येथील चोवीसवर्षीय डेऑप्स इंजिनिअरने एचडीएफसीच्या फेक ट्विटर हॅण्डलवर जावून एक नंबर मिळवला आणि तोच नंबर त्याचे बँकखाते साफ करण्यास कारणीभूत ठरला. त्या नंबरवर संपर्क केलेल्या व्यक्तीने या उच्चशिक्षित युवकास काही मिनिटांतच १ लाख ८० हजार रुपयांना ठकवले.
डेबीट कार्डचा फोटो काढायला लावून तसेच एनी डेस्क ॲप डाऊनलोड करायला लावून त्याचा मोबाइल हॅण्डल करत तब्बल सहा वेळा खात्यातील पैसे उडवले. आपल्या खात्यातील रक्कम गायब झाल्याचे समजल्यानंतर इंजिनिअरने बुलढाणा येथील सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी भादंवि कलम ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० अंतर्गत ६६ (क), ६६ (ड) अन्वये गुन्हे दाखल केले.
मलकापूर येथील हरिकिरण सोसायटीमधील रहिवासी प्रेमकुमार प्रकाश चांडक (२४) हा युवक मुंबई येथे डेआप्स इंजिनिअर म्हणून काम करतो. एचडीएफसी शाखा मलकापूर येथे सॅलरी अकाउंट तसेच बँक ऑफ इंडियाच्या मलकापूर शाखेत खाते आहे. १ एप्रिल रोजी प्रेमकुमारने एचडीएफसी खात्यातून बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर १० हजार रुपये एनइएफटीद्वारे पाठवले. चोवीस तास लोटूनही बँक ऑफ इंडियाच्या खात्यात रक्कम जमा झाली नाही. दुसऱ्या दिवशी २ एप्रिल रोजी सकाळी एचडीएफसी बँकेत संपर्क केला. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने एचडीएफसी ट्विटर हॅण्डलवर ऑनलाइन जावून ट्विट केले. एक ऑनलाइन मोबाइल नंबर मिळाल्याने त्यावर कॉल केला.
समोरील व्यक्तीने बँक इंडियाच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे मॅसेज केले. त्यामुळे विश्वास आल्याने प्रेमकुमार चांडकने संभाषण सुरू ठेवले समोरील भामट्याने सांगितले की तुमचे बँक रिवॉर्ड पॉइंट अपडेट नाहीत तसेच तुम्हाला भविष्यात मनी ट्रान्सफर करण्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी तुमच्या डेबीट कार्डचा फोटो द्या व एनी डेस्क ॲप डाऊनलोड करा, असे सांगितले. एनी डेस्क ॲप डाऊनलोड केल्यानंतर मोबाइलचा एक्सेस गेल्याने बोलता बोलताच त्या भामट्याने चांडक यांच्या खात्यातून १ लाख ८० हजार ४९८ रुपये काढून फसवणूक केली.
- Advertisement -
- Advertisement -
काही मिनिटांत केलेले ट्रान्झिक्शन पहिल्या वेळी २९९९० रुपये, दुसऱ्या वेळी २९९९०, तिसऱ्यावेळी ३० हजार, चौथ्यावेळी ३०५३५, पाचव्यावेळी २९९९० आणि सहाव्या वेळी २९९९० रुपये ऑनलाइन काढून सायबर गुन्हेगाराने उच्चशिक्षित अभियंत्याला मोठाच गंडा घातला.