Government scheme : ग्रामीण भागातील पशुपालक, सुशिक्षित बेरोजगार युवक, महिला, शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभच्या योजनांसाठी ८ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, एक हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, १०० कुक्कुट पिलांचे वाटप व तलंगा गट वाटप या योजनासाठी ऑनलाइन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया, या वर्षात राबविली जाणार आहे. डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे, त्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पध्दतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पशुसंवर्धन विभागाचे एएच महाबीएमएस हे संकेतस्थळ उपलब्ध करण्यात आले आहे. अर्ज करण्याची मुदत ही ८ डिसेंबरपर्यंत देण्यात आली आहे. योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाइन पध्दतीनेच स्वीकारले जातील. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून, अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून आली आहे. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाइल क्रमांकावर अर्जाच्या संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाइल क्रमांक बदलू नये व मागिल वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही. योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात येत आहे.