Jobs in Air India
बुलढाणा : जिद्द आणि चिकाटी असली की, आपल्याला हवं ते यश संपादन करता येतं. अश्या अनेक यशकथा आपण ऐकल्या, वाचल्या असतील. अशीच एका जिद्दी मुलीची कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत. विदर्भातील मागासलेला जिल्हा असे पालुपद लागलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील लेकीने आपल्या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या बळावर उज्जवल असं करिअर घडवले आहे. सामान्य कुटुंबातील या तरुणीने एअर इंडिया कंपनीत (Jobs in Air India )एअर होस्टेस होण्याचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील कु. मानसी सुनील इंगळे ही तरुणी आज सर्वांच्या कौतुकास पात्र ठरत आहे.
पैसे नसल्याने विमान सहल हुकली
आज आपण खूप प्रगत झालो आहोत. दळणवळणाची साधने सुद्धा तितकीच प्रगत आणि सर्वांना सोयीची झालेली आहेत. पूर्वी ग्रामीण भागात घरावरून विमान उडत गेले कि लोक छतावर जाऊन विमान पाहत असत. विमानात बसणे हे आजही ग्रामीण भागात स्वप्नच आहे. आजच्या स्टोरीत आपण ज्या तरुणीची ओळख करून घेणार आहोत ती सुद्धा ग्रामीण भागातील आहे. आपण कधी विमानात बसू किंवा प्रवास करू असे तिला लहानपणी कधी वाटले नसेल. आपला अनुभव तिने कथन केला आहे की, शाळेत शिकत असतांना हैद्राबाद येथे शाळेची सहल विमानाने जाणार होती. त्या सहलीत कु. मानसीला सुद्धा येण्याचे आग्रह शिक्षकांनी केले, परंतु घरची परिस्थिती बेताची होती याची जाणीव मानसीला होती आणि ती तेव्हा शिक्षकांना म्हणाली आज माझ्या जवळ पैसे नाहीत म्हणून मी सहलीला येऊ शकत नाही पण एके दिवशी एयर हॉस्टेस बनून विमानाने नक्की प्रवास करणार. सातव्या आठव्या वर्गात बोललेली ही गोष्ट आज सत्यात उतरली. ड्रायव्हर असलेल्या बापाची लेक एयर इंडिया मद्धे दाखल होणारी तालुक्यातील पहिली मुलगी ठरली.
कुटुंबाचा आनंद गगनात मावेना
चिखली शहरात राउतवाडी भागात राहणारे सुनील इंगळे हे खाजगी ड्रायव्हर चे काम करतात तर त्यांची पत्नी सौ. संगीता इंगळे ह्या सुद्धा घरकाम करून पाचगणी येथे गर्ल्स हॉस्टेल वर वार्डन म्हणून आज नोकरी करत आहेत. त्यांना मानसी आणि रोहन ही दोन आपत्य आहेत. घरी शेती किंवा मालमत्ता नसल्याने सुनील इंगळे यांनी ऑटो चालवून घर चालवणे सुरू ठेवले. कधी कधी खाजगी वाहनांवर बदली ड्रायव्हर चे काम केले. आज ते एका खाजगी वाहनांवर पूर्णवेळ ड्रायव्हर म्हणून नोकरी करीत आहेत. पण आपल्या प्रमाणे आपल्या लेकरांच्या नशिबीही हलाखीचे जीवन येऊ नये म्हणून दोघं पती पत्नीने बरीच मेहनत घेतली. त्याचंच फलस्वरूप आज त्यांची मोठी मुलगी कु मानसी इंगळे ही एयर इंडिया मध्ये एयर होस्टेस म्हणून दाखल झाल्याचा आनंद इंगळे कुटुंबियांसाठी शब्दात न मावणार इतके आहे.
एयर होस्टेस म्ह्णून निवड
कु. मानसीचे आज २२ व्या वर्षी एयर इंडिया मध्ये चयन झाले असून लहानपणी बघितलेले स्वप्न पूर्ण होत आहेत. तिचे हॉटेल मैनेजमेंट चे शिक्षण झालेले असून पुणे येथे एयर इंडिया तर्फे मुलाखती पार पडल्या होत्या, त्यात तिन्ही राउंड मध्ये ती पास झाली. नंतर तीन दिवस मेडिकल प्रक्रिया पूर्ण केल्या आणि आठ दिवसाच्या आताच तिला जॉब ऑफर आली. १९ जानेवारी रोजी ती ट्रेनिंग साठी मुंबई येथे गेली असून चार महिन्यांचा हा काळ आहे. यानंतर ती एयर इंडिया मध्ये एयर होस्टेस म्हणून सेवा देणार आहे.मानसी चे एयर इंडिया मध्ये एयर होस्टेस म्ह्णून निवड झाल्याचा आनंद तिच्या सर्व शिक्षकांना आणि मित्रांना सुद्धा झाला असून तिच्या कामाची दखल इतर मुलीही घेतील असे शिक्षकांनी सांगितले.
- Advertisement -
- Advertisement -
लहानपणी बघितलेले मुलीचे स्वप्न पूर्ण
आजकाल प्रत्येक क्षेत्रात मोठी स्पर्धा आहे. करिअर करताना देखील अनके अडचणी येतात. मात्र हा खडतर प्रवास पूर्ण करत यश संपादन केल्यावर आपली प्रतिक्रिया देतांना मानसी म्हणते की, मी माझ्या आई बाबांमुळेच इथपर्यंत येऊन माझे स्वप्न पूर्ण करू शकली. इतर मुलींनीही न घाबरता त्यांना हव्या असलेल्या क्षेत्रात जायला हवे. साहजिक आहे की, मुलींच्या प्रति पालकांना जास्त काळजी असते. आपले स्वप्न पूर्ण करत असतांना पालकांचा विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घेणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. माझ्या आई बाबा यांनी माझ्यावर विश्वास केला आणि मला गरज पडली त्यावेळेस ते माझ्या सोबत असायचे असे यावेळी मानसी ने सांगितले. तर आमच्या मेहनतीचे आज फळ आम्हाला मानसी ने दिले तिचा सार्थ अभिमान वाटतो असे मानसीच्या पालकांनी सांगितले. लहानपणी बघितलेले मुलीचे स्वप्न पूर्ण झाल्याचा त्यांनाही तितकाच आनंद आहे.
करिअरमध्ये भरारी घेतली
बुलढाणा जिल्हा मातृतीर्थ म्हणून ओळखला जातो. जगाला शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या सारखे दोन छत्रपती देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्म बुलडाणा जिल्ह्यात झालेला आहे. महिलांचे कार्यक्षेत्र चूल आणि मूल नाहीच हे बाळूकडू बुलढाणा जिल्ह्यातील मातीतुन मिळते. कु मानसी इंगळे हीने सुद्धा आपल्या करिअरसाठी वेगळी वाट निवडली. त्यासाठी अथक परिश्रम घेतले. तिच्या या मेहनतीला यश आले. आज ती एअर इंडिया मध्ये एयर होस्टेस म्हणून दाखल झाली आहे. कु मानसी हिच्या यशाने आनंद इंगळे कुटुंबियांसोबत जिल्हावासीयांना देखील तिचा सार्थ अभिमान वाटावा अशी मोलाची कामगिरी तिने केली आहे. लहानपणी बघितलेले स्वप्न पूर्ण करून तिने आपल्या करिअरमध्ये भरारी घेतली आहे.