Khamgaon : महात्मा गांधी आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केल्याने वादात आलेले संभाजी भिडे आज बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे दाखल झाले आहेत. येथील एका भाजपा कार्यकर्त्याच्या घरी त्यांनी भोजन केले. दरम्यान खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार ऍड. आकाश फुंडकर यांनी सुद्धा त्यांची भेट घेतली.
मनोहर कुळकर्णी उर्फ संभाजी भिडे आज बुलढाणा जिल्ह्यात आहेत. सकाळी त्यांचे शेगावात आगमन झाले.तेथे त्यांनी श्री संत गजानन महाराज याच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते खामगाव येथे आले आहेत. दरम्यान खामगाव येथे संभाजी भिडे यांच्या विरोधात आंदोलने करण्यात आलेली आहेत. त्यांचा खामगाव येथील कार्यक्रम रद्द करावा अशी मागणी सकल माळी सेवा संघाच्या वतीने करण्यात आली होती. तर आज सातत्याने पुरुषांचा अवमान करून सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी यांची खामगाव सभा रद्द करावी व त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा, यासाठी काँग्रेसच्या वतीने पोलीस स्टेशन समोरील गांधी पुतळ्या समोर आंदोलन करण्यात आले.
महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ निदर्शने केल्यानंतर भिडे च्या कार्यक्रमास प्रशासनाने परवानगी देऊ नये, कार्यक्रम रद्द करावा यासाठी उपविभागीय अधिकारी खामगाव यांना काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. या आंदोलनात धनंजय देशमुख सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, तेजेंद्र सिंग चव्हाण कार्याध्यक्ष सेवादल महाराष्ट्र प्रदेश,गौतम गवई सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग, अजय तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग, मोहम्मद वसीम सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यांक विभाग, अश्फाक भाई , पि.राजा, आकाश वासुदेव इंगळे,अध्यक्ष, अस्तित्व चॅरिटेबल ट्रस्ट, प्रहलाद फासे, बळीराम सावरकर, विजय सकळकर ,सागर इंगळे, प्रवीण तायडे ,अक्षय इंगळे, विष्णू घोरपडे, दिपक लोखंडे ,प्रेम इंगळे,अमन लोखंडे, अमित तायडे यंग ब्रिगेड जिल्हाध्यक्ष,मयूर हु्रसाड, आकाश जयस्वाल, सचिन जयस्वाल,विशाल दांडगे, मनोज बोदडे, राजू इखारे,डिगंबर पाटील, सौरभ रिचारिया, नितीन गावंडे, कैलास सिरसाट बहुजन टायगर संघटना, योगेश रायपुरे, मनोज तायडे, साहिल देशमुख, सोपान लाहुडकर, रमेश इंगळे,नसीम शाह, नितीन वाघ, श्रीकृष्ण गायकी, संतोष साळुंके, मा. सरपंच सोपान पाटिल , मनोज भोपळे , रमेशराव इंगळे , अजय सिरसाट, सागर इंगळे, विजय इंगळे, शुभम सिरसाट, सहदेव इंगळे इत्यादी सह इतरही कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisement -
- Advertisement -
दरम्यान मनोहर कुलकर्णी उर्फ भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्याकरिता विविध संघटनांच्या वतीने आज सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास काळे झेंडे दाखविण्यात आले. यावेळी संजय बगाडे सचिव,सत्यशोधक जनसेवा समिती महाराष्ट्र राज्य , माधव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सचिव तथा इतर पदाधिकारी यांना स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतले.
आमदार फुंडकर यांनी घेतली भेट
खामगाव आगमन झालेल्या संभाजी भिडे यांची आमदार आकाश फुंडकर यांनी घेतली भेट घेवून चर्चा केली. एकीकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचा संभाजी भिडे यांच्याशी संबंध नाही, असे विधान केले असताना आमदार आकाश फुंडकर यांनी संभाजी भिडे यांची भेट घेतल्याने वेगवेगळया चर्चा सुरु होत्या. येथील भिडेंच्या वक्तव्याचा सर्व सामाजिक संघटना अनेक पक्षाच्या कडून निषेध होत असून त्यांची सभा रद्द करावी म्हणून अनेक सामाजिक संघटनांनी अनेक राजकीय लोकांनी पुढार्यांनी निवेदन दिले. कदाचित सभा रद्द करण्यात येईल असा अंदाज होता. दरम्यान आमदार आकाश फुंडकर यांच्या गाडीत संभाजी भिडे घाटपुरी रोडवरील चोपडे यांच्या मळा मधील मंगल कार्यालयात सभास्थळी पोहचले. पाच वाजता सुरु होणारी सभा दुपारी तीन वाजता उरकण्यात आली.