Nagpur Police
नागपूर : लोकांना जबरदस्तीने पैसे मागणे काही तृतीयपंथीयांच्या अंगलट आले आहे. इंस्टाग्रामवर (Instagram)असा एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी या प्रकरणी ऍक्शन घेतली. चुकीच्या पद्धतीने नागरिकांना त्रास देत पैसे उकळणाऱ्या तृतीयपंथीयांविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल अटकेची कारवाई करण्यात आली. अश्या प्रकारे सोशल मीडियाच्या आधारे झालेली नागपूर शहरातील ही पहिलीच मोठी कारवाई आहे.
जबरदस्तीने पैसे मागत असल्याचा व्हिडीओ
लग्नात, बस, रेल्वेत किंवा चौकाचौकांत पैसे मागताना अनेकदा आपण तृतीयपंथी नागरिकांना पैसे मागतात. हा प्रकार नवीन नाही. मात्र नागपूरमध्ये काही जण खंडणी वसुली प्रमाणे पैसे मागून नागरिकांची अडवणूक करत होते. हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असे पोलीस आयुक्तांनी सूचित केले होते. तरीही काही तृतीयपंथी याला न जुमानता अलंकार टॉकीजजवळील चौकात ट्राफीक सिग्नलवर लोकांना जबरदस्तीने पैसे मागत असल्याचा व्हिडीओ पोलिसांच्या निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने पावले उचलून पाचही तृतीयपंथीयांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला. तृतीयपंथीयांविरोधात झालेली ही अशाप्रकारची पहिलीच कारवाई आहे. यामुळे शहरात चौकाचौकांत जबरदस्तीने पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांचे धाबे दणाणले आहे.
इन्स्टाग्रामवरील व्हिडीओची शहानिशा
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलीस निरीक्षक शुभांगी वानखडे यांना सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर किन्नर (तृतीयपंथी इसम) हे नागपूर शहरातील अलंकार टॉकीजजवळील चौकात ट्राफीक सिग्नलवर लोकांना जबरदस्तीने पैसे मागत असल्याचा व्हिडीओ दिसला. या माहितीची खात्री करून वानखडे यांनी इन्स्टाग्रामवरील व्हिडीओची शहानिशा केली असता त्यामध्ये ट्राफीक सिग्नलवर पैसे मागत असलेले तृतीयपंथी हे आकांक्षा तुकाराम बन्सोड (१९), मुस्कान सुनील शेख (२६), श्वेता शामराव पखाले (३१), वैशाली पाटील (२४) आणि अम्मू भगत (२६, सर्व रा. अंबेनगर, रेल्वेस्टेशनजवळ, भांडेवाडी पोलीस ठाणे, पारडी, नागपूर) असल्याचे निष्पन्न झाले.
विविध कलमांन्वये गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शशांक प्रदीप गट्टेवार (२४, रा. बेसा-पिपळा रोड, नागपूर) हे गिट्टीखदान हद्दीतील नर्मदा कॉलनीतील प्रशांत पाटील यांच्या घरी लग्नसमारंभाकरिता आले होते. १५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २ च्या सुमारास तृतीयपंथी आरोपी सोनू गौरे, छोटी गजभिये, जान्हवी स्टिफन पिटर, डिम्पल जॉन गजभिये, परी गजभिये (सर्व रा. झिंगाबाई टाकळी, मानकापूर, नागपूर) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या मित्राच्या घरी येऊन पैशाची मागणी केली. फिर्यादीने त्यांना १ हजार रुपये दिले असता आरोपींनी फिर्यादीला जबरदस्तीने ११ हजार रुपये खंडणीची मागणी केली. आरोपींनी जबरदस्तीने पैसे मागून पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने पाचही तृतीयपंथीयांविरुद्ध फिर्यादीच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
- Advertisement -
- Advertisement -
थेट तडीपार करण्यात येणार
भांडेवाडी रेल्वेस्टेशनजवळील परिसरात शोधघेतला असता यातील आकांक्षा तुकाराम बन्सोड, मुस्कान सुनील शेख, श्वेता शामराव पखाले हे तिघे आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या तृतीयपंथीयांनी गैरकायद्याची मंडळी जमवून ट्राफीक सिग्नलवर थांबलेल्या लोकांकडून जबरदस्तीने पैसे मागून पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळले. या पाचही तृतीयपंथीयांविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. उल्लेखनीय म्हणजे, शहरातील विविध चौकांमधे वाहनचालकांकडून तसेच समारंभामध्ये आयोजकांकडून पैसे वसूल करणाऱ्या तृतीयपंथीयांच्या विरोधात कारवाईचे पोलीस आयुक्तांनी निर्देश दिले होते. असा प्रकार झाल्यास थेट तडीपार करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले होते. ही कारवाईउपायुक्त (गुन्हे) मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी वानखडे, साहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधव, नायक पोलीस अंमलदार भूषण झाडे, राशीद शेख, पोलीस अंमलदार समीर शेख, अश्विन, पूनम शेंडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.