मुंबई : खासदार व अमरावती लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana)यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक संजय खोडके यांचा निवडणुकीच्या प्रचारार्थ विनापरवानगी फोटो वापरल्याने त्यांनी आक्षेप घेतला आहे. एखाद्या व्यक्तीचा परवानगीशिवाय फोटो वापरणे ही बाब निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारी आहे. यापुढे माझा फोटो वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाई करू, असा इशारा संजय खोडके यांनी खासदार राणा यांना दिला आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघातून खासदार राणा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. मात्र, भाजपमधील नेत्यांसह मित्रपक्ष बच्चू कडू, आनंदराव अडसूळ यांच्यासह अनेकांचा राणा यांना विरोध कायम आहे. महायुतीतूनच विरोध होत असल्याने मोठी गोची झालेल्या राणा यांनी पोस्टर व बॅनरवर महायुतीसह विविध नेत्यांचे फोटो लावत प्रचार सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी राणा यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा फोटो बॅनरवर लावला होता. मात्र, स्थानिक मनसे नेत्यांनी आक्षेप घेतल्यानंतर राज ठाकरे यांचा फोटो हटवला. पण त्यानंतर आता अमरावतीतील अजित पवारांचे समर्थक संजय खोडके यांचा राणा यांनी आपल्या प्रचारार्थ बॅनरवर परवानगीशिवाय फोटो वापरला आहे. कोणत्याही परवानगीशिवाय फोटो वापरल्याने खोडके यांनी आक्षेप घेत राणा यांना पत्र लिहिले आहे.
मी अजित पवार यांचा समर्थक आहे, पण कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी नाही. त्यामुळे अशा पद्धतीने लोकसभा प्रचारासाठी विनापरवानगी फोटो वापरणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया संजय खोडके यांनी दिली.
अमरावती लोक सभा निवडणुकीच्या आपल्या प्रचाराच्या बॅनरवर तथा सोशल मीडियात आपण माझा फोटो लावला आहे. फोटो वापरण्याबाबत माझी व्यक्तिगत अनुमतीसुद्धा आपण घेतलेली नाही. ही बाब निवडणूक आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारी आहे. लोकसभा निवडणुकीत माझ्या फोटोचा व नावाचा वापर करू नये, आपण माझ्या फोटोचा वापर ज्या-ज्या ठिकाणी केला आहे, तेथून तो त्वरित काढून टाकावा, अन्यथा मला कायदेशीर कारवाई करावी लागेल असा, इशारा संजय खोडके यांनी खासदार नवनीत राणा यांना दिला आहे.