Old Pension Scheme
मुंबई : जुनी पेंशन योजना (Old Pension Scheme) लागू करावी या मागणीसाठी राज्यभरातील कर्मचारी संपावर गेले होते. अखेर मंगळवारी हा संप मागे घेण्यात आला आहे. आपल्या मागण्याबाबत संपकरी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्यानंतर सात दिवसांपासून शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्याचा सुरु असलेला संप मंगळवारी अखेर मागे घेण्यात आला आहे. संप मागे घेत असल्याचे संघटनेच्या समन्वयकांकडून जाहीर करण्यात आला.
संपात 18 लाख कर्मचारी सहभागी
जुनी पेन्शन (Old Pension Scheme) लागू करा, या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील सुमारे 18 लाख सरकारी कर्मचारी (Maharashtra Government Employees) 14 मार्च रोजी संपावर गेले होते. गेल्या आठवडाभरापासून राज्यभरातील सरकारी कर्मचारी वर्गाचा हा संप सुरु होता. या संपात शासकीय-निमशासकीय कर्मचारी यामध्ये मंत्रालय, नगरपालिका, जिल्हा कार्यालय, शासकीय रुग्णालये, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे जनतेची अनेक कामे रखडून त्यांची गैरसोय सुरु होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत चर्चा झाली असून ती यशस्वी झाल्याचं संघटनेच्या समन्वयकांकडून जाहीर करण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्याच्या मागणीचा प्राथमिक स्तरावर स्वीकार केल्याचं आश्वासन सरकारने दिल्याचंही आंदोलकांच्या समन्वयकांकडून सांगण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री यांनी दिला असा शब्द
जुनी पेन्शन योजना लागू करावी, ही बाब आम्ही तत्त्व म्हणून स्वीकारत आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी त्यांचा सात दिवसांपासूनचा संप मागे घेतला. सर्व कर्मचारी आज, मंगळवारपासून कामावर रुजू होतील. संप मागे घेण्यात आला असला तरी जुन्या पेन्शनचा प्रश्न मात्र कायमच आहे. कारण ही योजना तत्काळ लागू करण्याचा कोणताही निर्णय सरकारने जाहीर केलेला नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी संपकरी सरकारी, निमसरकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या नेत्यांशी सोमवारी दुपारी विधानभवनातील त्यांच्या दालनात चर्चा केली. जुन्या पेन्शनच्या मागणीवर अभ्यास करण्यासाठी तीन निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची समिती राज्य सरकारने नेमली होती, पण अशा समितीचा प्रस्ताव संपकरी संघटनांनी आधी धुडकावून लावला होता. तथापि, मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर हा प्रस्ताव संघटनांनी स्वीकारला. समिती तीन महिन्यांत राज्य सरकारला अहवाल देईल. या समितीसमोर संपकरी संघटना त्यांची बाजूही मांडणार आहेत. जुनी पेन्शन योजना लागू केल्याची आधी घोषणा करा, तरच संप मागे घेऊ ही भूमिका मवाळ करत संपकरी संघटनांनी समितीचा पर्याय स्वीकारला आहे.
बोलणी यशस्वी झाली: विश्वास काटकर
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव बैठकीला उपस्थित होते. १४ मार्चपासून राज्यातील क आणि ड वर्ग कर्मचारी संपावर होते आणि त्यांनी अभूतपूर्व एकी दाखविली. सरकारी कामकाज अनेक ठिकाणी कोलमडले होते. सरकारच्या उत्पन्नावरही विपरीत परिणाम झाला. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे अडले होते.समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर पत्रकारांना सांगितले की, आमची बोलणी यशस्वी झाली. जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा सरकार गंभीरपणे विचार करत आहे. माहिती मिळवण्यासाठी व त्यातून निर्णय घेण्यासाठी समिती नेमलेली आहे. तत्त्व म्हणून सरकारने जुन्या पेन्शन योजनेची भूमिका स्वीकारली आहे. जुन्या व नवीन योजनेतील आर्थिक अंतर नष्ट करून सर्वांना समान निवृत्तिवेतन मिळेल, असे लेखी आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.राज्यातील सर्व कर्मचारी बंधू-भगिनींनी अभेद्य एकजूट दाखवली. या आंदोलनात कोणतीही हिंसा नव्हती. हा संप त्या सगळ्यांनी यशस्वी करून दाखवला. मुख्यमंत्र्यांबरोबर आज सविस्तर चर्चा झाली. ही चर्चा यशस्वी झाली. कारण आमची मूळ मागणी सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करा अशी होती. शासनाने यासंदर्भात गेल्या सात दिवसांत वेगवेगळी पावलं उचलली आहेत. सरकारकडून आम्हाला सांगण्यात आलंय की याबाबत ते गंभीर विचार करत आहेत. यासंदर्भात सरकारनं समिती नेमली आहे. ती समिती आधी आम्ही नाकारली होती. पण आज सरकारने एक नवा प्रस्ताव सादर केला. त्यानुसार प्रिन्सिपल म्हणून जुन्या पेन्शन योजनेची संपकऱ्यांची मागणी स्वीकारण्यात आली. जुनी आणि नवी पेन्शन योजना यात मोठं अंतर होतं. यापुढे सर्वांना समान निवृत्तीवेतन मिळेल, त्यात अंतर राहणार नाही अशी भूमिका शासनाने आम्हाला लेखी स्वरूपात कळवली आहे. त्यामुळे जुनी पेन्शन योजना महाराष्ट्रात सुरू होईल. ती निकोप होण्यासाठी समिती त्याबाबत विचार करेल, अशी माहितीही संपकरी कर्मचाऱ्यांचे समन्वयक विश्वास काटकर यांनीदिली आहे..