Pneumonia in children : चीनमध्ये मागील आठवड्यामध्ये मुलांमध्ये श्वसनाच्या अर्थात न्यूमोनिया (Pneumonia disease) आजाराचे रुग्ण वाढत आहेत. या मुलांमध्ये न्यूमोनिया होण्याचे कारण प्रामुख्याने इन्फ्ल्यूएंझा, मायकोप्लाझा आणि सार्स कोविड- १९ हे आहेत. सद्यःस्थितीमध्ये चीनमधील या उद्रेकाचे राज्य आणि देशासाठी धोक्याचे कारण नाही. मात्र, या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यासह राज्यामध्ये उपाययोजना करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. याबाबत पूर्वतयारी, आवश्यक मनुष्यबळ, प्रयोगशाळांची तयारी करण्याच्या दृष्टीने मंगळवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यतः आय.एल.आय.सारी सर्वेक्षण करण्यासाठी सर्व जिल्ह्यांनी आणि महानगरपालिकेने आपल्या अंतर्गत असलेल्या सर्व आरोग्य संस्थांना सर्वेक्षण, बळकटीकरण करून सर्व रुग्णांची आय.एच.आय.पी. पोर्टलवर नोंद करावी. तसेच सर्व जिल्ह्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील असलेल्या आरोग्य संस्था विशेषतः वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालयांनी आय.एल. आय/सारी सर्वेक्षणावर विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाने केल्या आहेत.
तसेच सर्व जिल्ह्यांतील कोविड रुग्णालयांमध्ये खाटांची तयारी, ऑक्सिजन उपलब्धता, व्हेंटिलेटर उपलब्धता, मनुष्यबळ तयारी व ऑक्सिजन प्लान्ट आणि ऑक्सिजन सिलिंडर कार्यान्वित आहेत की नाही, याची खातरजमा करावी. आपल्या आरोग्य संस्थांमधील आय.एल. आय./ सारी रुग्णांचे नमुने आरटीपीसीआर प्रयोगशाळांना पाठविण्यात यावेत. तसेच सारी रुग्णाचे काही नमुने जनुकीय क्रमनिर्धारण करण्यासाठी पुणे राष्ट्रीय विषाणू संस्था येथे पाठविण्यात यावेत. राज्यात रुग्णालयामध्ये संसर्ग नियंत्रण पद्धती जसे वारंवार हात धुणे, मास्क घालणे, पीपीई कीटचा वापर करणे इत्यादी गोष्टींवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे आणि सर्व रुग्णालयांमध्ये या गोष्टींचा अवलंब होईल खातरजमा करावी. सर्व आरोग्य संस्थांमध्ये सारी व इतर श्वसन संस्थेच्या आजारांसाठी लागणारी औषधे उपलब्ध आहेत, याचा खातरजमा करावी. तसेच ऑक्सिजन सिलिंडर, रुग्णवाहिका उपलब्ध राहतील याची खात्री करावी. सर्व जिल्ह्यांनी आय.एच.आय.पी. पोर्टलवरील सारी नोंद केलेल्या रुग्णांच्या भागामध्ये क्लस्टरिंग ऑफ केसेस आहे की नाही, याची खातरजमा करावी. आय.एच.आय.पी. पोर्टलवर सारी इव्हेंट अलर्ट नोंदविला असल्यास जिल्हा शीघ्र तपासणी पथकाने त्याचे अन्वेषण करावे. सर्व जिल्ह्यांमध्ये कोविडबाबत आरोग्य शिक्षण करण्यात यावे. विशेषतः श्वसनसंसर्ग असणाऱ्या काळजी घेण्याबाबत भर द्यावा; तथापि जनतेमध्ये विनाकारण भीती नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. प्रताप सारणीकर यांनी केले आहे.