Ravikant Tupkar gives a serious warning to the government
अकोला : सामान्यांच्या प्रश्नांवर केलेल्या अनेक आंदोलनांमुळे माझी २०१३ साली बुलडाणा जिल्ह्यासह पाच जिल्ह्यातून एक वर्षीसाठी तडीपारी करण्यात आली होती. त्यादरम्यान तत्कालीन गृहमंत्री स्व.आर.आर.पाटील यांची भेट झाली सर्व प्रकार आबांना समजताच आबांनी तात्काळ गृह सचिवांना फोन केला. “चळवळीतील कार्यकर्त्यांना तडीपार करत असतात का..?” रविकांत तुपकरांची तडीपारी रद्द करा,असे सांगितले.. यामागे चळवळीतील कार्यकर्ते जिवंत राहिले पाहिजे ही आबांची भावना होती.. अशा शब्दात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.पाटील आबा (R. R. Aaba)यांच्या पावन स्मृतीस शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी विनम्र अभिवादन केले, आणि अकोला कारागृहातून सुटका होताच त्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. रविकांत तुपकर व २४ आंदोलकांची आज अकोला (Akola) तुरुंगातून जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
सरकार विरोधात महाराष्ट्रभर फिरणार
आम्ही सोयाबीन, कापसाला भाव, पीक विमा तसेच नुकसान भरपाई मागत आहोत. मात्र सरकार आम्हाला नक्षलवादी, आतंकवादी यांच्या सारखी वागणूक देत आहे. खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला जेल मध्ये टाकल्या जात आहे. पण आम्ही घाबरणारे नाही. गावखेड्यातील शेतकरी आता जागा झाला आहे, येणाऱ्या काळात सरकारला जागा दाखवून देईल. आता सरकार विरोधात महाराष्ट्राभर फिरणार आहोत, आता आंदोलन आरपारचे आणि सरकारच्या बुडाखाली आग लावणारे असेल असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शिंदे सरकारला दिला आहे. आज १६ फेब्रुवारी रोजी अकोला कारागृहातून सुटका झाल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
चार दिवस कारागृहात
चार दिवस कारागृहात असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची आज २५ कार्यकर्त्यांसह जामिनावर सुटका झाली. यावेळी शेतकरी आणि कार्यकर्ते अकोला येथे मोठ्या संख्येने हजर होते. हजारो गुन्हे दाखल झाले तरी चालतील, वेळप्रसंगी फासावर गेलो तरी चालेल मात्र रविकांत तुपकर व त्यांचे मावळे मागे हटणार नाहीत. खोट्या केसेस, गंभीर खटले दाखल करून चळवळी मोडीत काढण्याचे काम सरकार करत आहे, पण जेव्हढा दाबायचा प्रयत्न तेव्हड्या ताकदीने आम्ही लढणार आहोत. बुलढाणा येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरवर आहोत असेही त्यांनी सांगितले.
पीकविमा, अतिवृष्टीची मदत आणि सोयाबीन-कापसाला भाव मिळाला यासाठी ११ फेब्रुवारी रोजी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन शांततेत सुरु असताना पोलिसांनी आंदोलकावर अमानुष लाठीमार करुन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रविकांत तुपकरांसह २४ जणांना अटक करुन त्यांच्यावर भां.द.वी. ३५३, ३०९, १७१, १४७, १४८, १४९, ३३६, १०९, १८८ सह कलम ३ प्रॉपर्टी डॅमेज ॲक्ट, सहकलम १३५ मु.पो.का. नुसार गुन्हे दाखल केले होते.
तुपकर व आंदोलकांची सुटका : श्रींचे दर्शन
१२ फेब्रुवारी रोजी दुपारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात या सर्वांना बुलढाणा जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने या सर्वांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. बुलढाणा कारागृहात जागा नसल्याचे सांगत या सर्वांची रवानगी अकोला कारागृहात करण्यात आली. दरम्यान सदर आंदोलकांच्या वतीने ॲड. शर्वरी तुपकर यांनी १३ फेब्रुवारी रोजी जमानत अर्ज दाखल केला, त्यावर १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात आली. यामध्ये न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकूण घेतला होता तर १५ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने या सर्व २५ जणांचा जामीन मंजूर केला. १५ हजार रुपयांचा जात मुचलका आणि इतर काही अटी व शर्तींवर या सर्वांची सुटका करण्यात येणार आहे. ॲड. शर्वरी तुपकर यांनी सर्व आंदोलकांच्या बाजूने केलेला युक्तीवाद अखेर प्रभावी ठरला असून न्यायदेवतेने शेतकरी आंदोलकांना मोठा दिलासा दिला आहे. १५ फेब्रुवारी रोजी जमानत मंजूर झाली असली तरी कायदेशीर बाबींची पूर्तता त्यानंतर कारागृहातील सोपस्कार पार पाडून रविकांत तुपकर व २४ आंदोलकांची १६ फेब्रुवारी रोजी कारागृहातून सुटका झाली. अकोला येथून ते शेगाव येथे आले. श्री संत गजानन महाराज मंदिरात जाऊन त्यांनी श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
- Advertisement -
- Advertisement -