नवी दिल्ली : ‘मेटा’ कंपनीचे मालकत्व असलेल्या WhatsApp ने माहिती-तंत्रज्ञान (आयटी) नियमांचे पालन करीत गेल्या सप्टेंबर महिन्यात तब्बल ७१.१ लाख भारतीय खाती बंद केली आहेत. याबाबत लोकप्रिय सोशल मीडिया WhatsApp ने भारताच्या संदर्भातील मासिक अहवालातून गुरुवारी खुलासा केला आहे. भारतीय WhatsApp ची खाती ‘ +९१’ क्रमांकावरून ओळखली जातात, हे विशेष. WhatsApp ने ‘युजर्स सुरक्षा’ या शीर्षकाखाली सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे की, १ ते ३० सप्टेंबर २०२३ दरम्यान ७१ लाख १० हजार खाती बंद करण्यात आली आहेत.
यापैकी भारतातील सुमारे २५.७ लाख व्हॉट्सअॅप युजर्सनी कोणताही प्रतिसाद देण्यापूर्वीच त्यांची सक्रिय खाती बंद करण्यात आली आहेत. वापरकर्त्याकडून मिळालेल्या तक्रारींचा तपशील, व्हॉट्सॲपद्वारे केलेली संबंधित कारवाई, तसेच प्लॅटफॉर्मवरील गैरवर्तनाचा सामना करण्यासाठीच्या नियमानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. मागील १ ते ३० सप्टेंबरदरम्यान व्हॉट्सअॅपच्या तक्रार अपील समितीने ६ आदेश पारित केले. त्याची अंमलबजावणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
तत्पूर्वी ऑगस्ट महिन्यात ७४ लाख व्हॉट्सअॅप खाती बंद करण्यात आली. यापैकी ३५ लाख खाती सक्रियरीत्या बंद करण्यात आली. व्हॉट्सअॅपने आपल्या ताज्या अहवालात म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये युजर्स समर्थन (१,०३१), बॅन अपील (७, ३९६ ) इतर समर्थन (१,५१८), उत्पादन समर्थन ( ३७०) आणि सुरक्षितता (१२७), असे एकूण १०,४४२ युजर्सचे अहवाल मिळाले. त्याआधारे ८५ – खात्यांवर कारवाई करण्यात आली. दरम्यान, ‘अकाऊंट्स अॅक्शनड’ वरून अहवालाच्या आधारे कारवाई केल्याचे स्पष्ट झाले आहे. असे पाऊल उचलणे म्हणजे एखाद्या खात्यावर बंदी घालणे किंवा तक्रारीचा परिणाम म्हणून पूर्वी बंद केलेली खाती पुनर्संचयित करणे होय, असे WhatsApp च्या सूत्रांनी सांगितले.